Good news नागपूर नंतर आता पुण्यात ‘एम्स’ रुग्णालयाची उभारणी!!
AIIMS Pune Latest Update

AIIMS Pune Latest Update – पुणे शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) रुग्णालय स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नागपूरनंतर पुण्यात हे प्रतिष्ठित रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष रस दाखवला आहे. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुण्यातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीही त्यांनी सूचनांचा पुनरुच्चार केला. औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य विभागाच्या मालकीच्या सुमारे ८० एकर जागेत हे एम्स रुग्णालय उभारण्याची योजना आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध विभागांचे सचिव तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे उपस्थित होते. या बैठकीत पुण्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सोयीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर’ रस्त्याच्या व्यवहार्यता तपासणीबाबतही उपमुख्यमंत्री पवार यांनी निर्देश दिले. त्याचबरोबर लोणावळा येथे प्रस्तावित स्कायवॉक, टायगर पॉइंट परिसरातील सुधारणा, पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’ संस्थेची नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर व अमरावती येथे विभागीय उपकेंद्रे उभारणी, वढू व तळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुण्यातील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुणे शहर आणि उपनगरांतील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे रिंगरोड प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरवर्षी पुण्यात लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा ताण वाढत आहे. ही समस्या हाताळण्यासाठी मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल आणि रिंगरोड यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय साधत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.