अंगणवाड्यांमध्ये यंदापासून शिकवला जाणार नवीन अभ्यासक्रम!
Anganwadi School Adharshila 2025

राज्यातील अंगणवाड्यांतील पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तीन वर्षांच्या ‘बालवाटिका’ अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ३० लाख बालकांच्या शालेय शिक्षण प्राथमिक पायाभरणीत एकसंधता निर्माण होणार आहे. मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेल्या ‘आधारशिला’ अभ्यासक्रमाच्या आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या ‘आधारशिला बालवाटिका १, २ व ३’ असा अभ्यासक्रम ३ ते ६ वयोगटातील बालकांकरिता तयार केला आहे. या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू केली जाणार आहे.
खेळणी आधारित शिक्षण सामग्रीचा वापर
नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे तो शिक्षणाला खेळाशी जोडतो. ‘जादुई पिटारा’, ‘ई-जादुई पिटारा’, आधारशिला किट्सचा अभ्यासात वापर यांसारख्या खेळणी आधारित शिक्षण सामग्रीचा वापर अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे बालकांचे संज्ञानात्मक, सामाजिक, भावनिक व शारीरिक विकासाचे उद्दिष्ट सुलभ होईल.
सेविकांना प्रशिक्षण – अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एनसीईआरटी, एससीईआरटी, डायट यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्यात येतील. विशेषतः खेळाधारित शिक्षण पद्धतीवर भर असलेल्या या प्रशिक्षणात सेविका, मदतनीस व पूर्वप्राथमिक शिक्षक सहभागी करून घेतले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तर बारावीपूर्व शिक्षण घेतलेल्या सेविकांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स (प्रशिक्षण प्रमाणपत्र) राबवण्यात येईल. हे प्रशिक्षण एससीईआरटीच्या समन्वयाने दिले जाणार आहे.