म्हाडाची ‘प्रथम प्राधान्य’ योजना, २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद – Mhada pratham pradhanya yojana
Mhada pratham pradhanya yojana
म्हाडाच्या कोकण मंडळातील ११ हजार १८७ घरांची विक्री ‘प्रथम प्रधान्य’ तत्त्वावर करण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट असलेल्या २० टक्के योजनेतील घरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६६१ पैकी ४५३ घरांसाठी २६०० हून अधिक अर्ज सादर झाले होते. त्यातील प्रथम अर्ज करणाऱ्या ४५३ अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून शनिवारी या अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी त्यास दुजोरा दिला. २६०० अर्जाची छाननी करून पात्र ४५३ अर्जदारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. प्रथम अर्ज करणारे हे पात्र अर्जदार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून घरांचे वितरण करण्यात येणार आहे. २० टक्के योजनेतील घरे विकली जात नसल्याने कोकण मंडळ आर्थिक नुकसानीत आले आहे.
११ हजार १८७ घरांमध्ये सर्वाधिक नऊ हजार ८८३ घरे ही ‘PMNY’ मधील असून ६६१ घरे २० टक्के योजनेतील आहेत. तर ५१२ सदनिका एकात्मिक आणि १३१ घरे विखुरलेली आहेत. या घरांसाठी अर्ज विक्री- स्वीकृती सुरू होऊन आठवडा झाला असून या ‘पीएमएवाय’ योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘प्रथम प्राधान्य’मधील ‘PMNY’ घरांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली आहे.