राज्यात प्रत्येक शिक्षण विभागात लवकरच आनंद गुरुकुल निवासी शाळा | Maharashtra Anand Gurukul School Admission
Maharashtra Anand Gurukul School Admission

Maharashtra Anand Gurukul School Admission: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षात शाळा पूर्व (श्वी) ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शिक्षण विभागात ८ आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे. या उपक्रमासाठी आवश्यक अहवाल तयार करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून, या गटाच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आनंद गुरुकुलचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुशल मनुष्यबळ तयार करणे.
आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी २०० विद्यार्थी एवढी असेल. या शाळांमध्ये श्वी ते १२वीच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबरच २१व्या शतकाची गरज विचारात घेऊन क्रीडा, कला, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इत्यादी विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अभ्यास शिकविण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.
अभ्यासगट काय करणार?
- आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळांची स्थळनिश्चिती करणे
- शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम तयार करणे
- प्रवेश पद्धती निश्चित करणे या शाळांची नियमित कार्यपद्धती, दिनदर्शिका ठरविणे
सुयोग्य शाळांची निवड
राज्यातील ८ शैक्षणिक विभागांपैकी धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती या पाच जिल्ह्यांत शासकीय विद्यानिकेतन सुरू आहेत. याव्यतिरिक्त अन्य तीन शैक्षणिक विभागांत शासकीय विद्यानिकेतनप्रमाणेच सुविधा आणि सुस्थितीत असलेल्या सुयोग्य शाळांची (प्रति विभाग एक शाळा) निवड अभ्यासगट आनंद गुरुकुलसाठी करील.
नैपुण्य शाखांचा अहवाल सादर होणार
क्रीडा, कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इ. विशेष नैपुण्य शाखांचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबाबतचा अहवाल उपसमिती अभ्यास गटाला सादर करेल.