खुशखबर! B Pharm च्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील!
BPharm Admission 2024 Details
विविध राज्यांच्या प्रवेश नियामक प्राधिकरणांनी केलेल्या मागणीला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यात मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे आता बी. फार्मसीची प्रवेश प्रकिया सुरू करण्यातील अडथळा दूर झाला आहे.
यंदा काही फार्मसी कॉलेजांनी मान्यता प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी ही मागणी घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत या कॉलेजांची मान्यता प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते, तर ३० नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती, सूचना घ्याव्यात असे आदेश दिले. त्यानुसार यंदा पीसीआयने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश विविध राज्य सरकारांच्या प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राधिकरणांना दिले होते. त्यातून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यंदा सीईटी सेलने बी. फार्मसीच्या प्रवेशासाठी ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली होती. मात्र कॉलेजांची मान्यता प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रवेशाची कॅप फेरी राबविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यातून बी. फार्मसीच्या नोंदणीला आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्याची वेळ सीईटी सेलवर आली. परिणामी बी. फार्मसीची महाविद्यालये डिसेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर कॉलेजांची मान्यता प्रक्रिया जलदगतीने राबवून प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी तंत्रशिक्षण संचालनालयाने पत्राद्वारे फार्मसी कौन्सिलकडे केली होती. त्याला पीसीआयने सकारात्मक प्रतिसाद देत बी. फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला आहे.