अग्निशमन दलात महिलांना प्रथमच नोकरीची संधी! – Female Fire Department Bharti 2025
Female Fire Department Bharti 2025
महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर पदांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महिलांनाही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलात महिला फायरमन दिसणार आहेत. यासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत २० मुली उत्तीर्ण झाल्या असून, २४ जानेवारीला मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. महापालिका अग्निशामक दलाचे मुख्यालय संत तुकारामनगरमध्ये आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, तळवडे येथे उपकेंद्र होती. मात्र, शहराचा झालेला विस्तार, वाढलेली बांधकामे पाहता आणखी उपकेंद्रांची आवश्यकता होती. त्यानुसार मोशी, चिखली, थेरगाव आदी तीन उपकेंद्र सुरू गेल्या दोन वर्षांत सुरू केली आहेत. त्यामुळे अग्निशामक दलामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी गेल्या वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन लेखी परीक्षा झाली होती. त्याचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर चार ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे. त्यात उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी २२ ते २४ जानेवारी रोजी भोसरी इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात होणार आहे.
अशी असेल पुढील प्रक्रिया
– लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यापूर्वी ऑनलाइन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
– अर्ज, त्यातील माहिती व कागदपत्रे पडताळणीमध्ये उमेदवारांचे छायाचित्र, वय, शैक्षणिक अर्हता, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, खेळ प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त दाखला, अनाथ दाखला, होमगार्ड, विवाह नोंदणी किंवा नावात बदल केल्याचे राजपत्र, संगणक अर्हता आणि श्रेणी पद्धत तपासली जाईल
– ऑनलाइन परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि शारीरिक क्षमता मैदानी चाचणी घेतली जाईल
– मैदानी चाचणीसाठी स्मार्टवॉच, स्टॉप वॉच, मोबाईल वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधने जवळ बाळगण्यास मनाई आहे, तसे आढळल्यास उमेदवारास बाद केले जाईल
पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलामध्ये सध्या महिला नाहीत. मात्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय संचालित मुंबई सांताक्रूज येथील महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमीतील १२ विद्यार्थिनींना शिकाऊ उमेदवार म्हणून २०२२ मध्ये प्रशिक्षण दिले होते. त्या अग्निशामक (फायरमन) आणि उपअधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पदाचा (सबऑफिसर व फायर प्रिव्हेंशन ऑफिसर) अभ्यासक्रम (कोर्स) करत होत्या.