महत्वाचे! पुढील वर्षीपासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य!
Marathi Language compulsory in Maharashtra
राज्य मंडळासोबतच इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचा (Marathi Language compulsory in Maharashtra) नवा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यानुसार गेली दोन वर्षे देण्यात आलेली मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत २०२७-२६ या शैक्षणिक वर्षांपासून रद्द करण्यात येणार आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाचा अपडेट आहे. तेव्हा हि माहिती आपल्या सर्व ओळखीच्यांना शेयर करायला विसरू नका!
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय २०२० मध्ये राज्य सरकारने घेतला होता. तो लागूदेखील करण्यात आला. मात्र, सीबीएसई आदी शाळांमध्ये मराठी भाषा अवगत करणे आणि त्यात चांगले गुण मिळविण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर २०२३ मध्ये आधीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार मराठी भाषा अनिवार्य राहीलच, पण गुणांकनाऐवजी श्रेणी स्वरूपात (अ, ब, क, ड) मूल्यांकन करण्याची मुभा देण्यात आली. श्रेणी पद्धतीमुळे या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत मराठी भाषेसमोर श्रेणीचा उल्लेख केला जातो व गुणांकनावर त्याचा परिणाम होत नाही.
मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने असे स्पष्ट केले आहे की, कोरोना काळात एकाचवेळची बाब म्हणून श्रेणी स्वरूपातील मूल्यांकनाचा निर्णय घेण्यात आला होता. ही सवलत २०२२-२३ च्या आठवीच्या बॅचबाचत घेण्यात आली होती. ही बॅच आता २०२४-२५ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेली असेल. त्यामुळे आता एकवेळची बाब म्हणून घेतलेला तो निर्णय पुढे लागू राहणार नाही. २०२५-२६ या सत्रापासून मराठी भाषा सर्व प्रकारच्या शाळांमध्ये सक्तीची तर असेलच शिवाय मराठीचा पेपर हा गुण देऊन तपासला जाईल. गुणपत्रिकेत मराठीसमोर गुणांचा उल्लेख राहील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीसाठीदेखील मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्यात आले असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.