AIचा नवा अध्याय! राज्यात तीन शहरांमध्ये साकारणार बुद्धिमत्तेची केंद्रे | New Al Skill Centers In Maharashtra
New Al Skill Centers In Maharashtra

New Al Skill Centers In Maharashtra: मंगळवार, १५ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने IBM टेक्नॉलॉजी कंपनीसोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) केला. हा करार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रशासनात प्रभावीपणे करण्यासाठी करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला.
या भागीदारीमुळे राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा कार्यक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार आहे. IBM च्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून महाराष्ट्रात डिजिटल युगाच्या दिशेने ठोस पावले टाकली जात आहेत.
महाराष्ट्र शासनाने IBM टेक्नॉलॉजी (इंडिया) सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला असून, या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या भागीदारीमुळे राज्यात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा उद्देश आहे.
केंद्रांची ठिकाणनिहाय उद्दिष्टे:
- मुंबईत एआय आधारित भौगोलिक विश्लेषण केंद्र स्थापन होणार आहे.
- पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा व संशोधन केंद्र उभारले जाणार आहे.
- नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधन तसेच MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले जाईल.
या उपक्रमांतर्गत AI, हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा, ऑटोमेशन यांसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून शासकीय सेवा अधिक जलद, परिणामकारक आणि वैयक्तिक अनुभव देणाऱ्या बनवण्यात येणार आहेत. या सेवांमध्ये व्हर्च्युअल सहाय्यक, एजेन्टिक एआय यांचा वापर करण्यात येईल.
प्रशासकीय मालकी आणि डेटा नियंत्रण:
या करारानुसार, तयार होणाऱ्या एआय मॉडेल्सचा पूर्ण मालकी हक्क व नियंत्रण महाराष्ट्र शासनाकडे असेल, ज्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर स्थानिक गरजेनुसार योग्य पद्धतीने केला जाईल.
प्रशिक्षण आणि उद्योगांसाठी संधी:
IBM च्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना AI, क्लाऊड तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण दिलं जाईल. यासोबतच MSME आणि उद्योग क्षेत्रालाही AI व ऑटोमेशन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, जे उत्पादनक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यास मदत करेल.
उच्चस्तरीय उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण करार प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसेच IBM चे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.