PMRDA च्या योजनेला अर्ज करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ! | PMRDA Lottery Registration
PMRDA Lottery Registration
PMRDA Lottery Registration: : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज करण्यासाठीच्या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून, या योजनेला दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
मात्र, विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यग्र असल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागला. ते लक्षात घेत पीएमआरडीए प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अर्ज मागविण्याची प्रक्रिया गेल्या १२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पंधरा दिवसांची मुदतवाढ जाहीर केली. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नागरिकांना सदनिकेच्या लॉटरीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर १ जानेवारीला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे. त्यावर २ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. १३ जानेवारीला स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून, २२ जानेवारीला अंतिम सोडत काढण्यात येईल. सोडतीमधील पात्र आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील, असे डॉ. म्हसे यांनी सांगितले.
‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ येथील सदनिकांसाठी ३ हजार ८५ नागरिकांनी ऑनलाइन अर्जाची नोंदणी केलेली आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत हीनोंदणी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेबर २०२४ पर्यंतआहे, असे आवाहन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ येथील ४ हजार ८८३ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ७९२ सर्व सुविधांयुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. यामध्ये शिल्लक असलेल्या एकूण १ हजार ३३७ सदनिकांसाठी इच्छुकांकडून प्रशासनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.