शाळांमध्ये ‘पीएमश्री’ प्रमाणे आता ‘सीएमश्री’ योजना सुरु होणार, सरकारी शाळा सुधारणार! – Maharashtra CM Shri Yojana 2025
Maharashtra CM Shri Yojana 2025
आत्ताच प्राप्त माहिती नुसार एक महत्वाचा अपडेट जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात ‘पीएमश्री’च्या धर्तीवर आता ‘सीएमश्री’ योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पीएमश्रीसाठी निवडलेल्या शाळांना वगळून इतर शाळांमध्ये समग्र अभियानांतर्गतील बालवाटिका, स्मार्ट क्लासरूम, प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आदी गोष्टींची पूर्तता करून मुलांच्या शिक्षणाची गरज भागवली जाणार आहे. सरकारी शाळांमध्ये गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच शिक्षण दिले जाते. अशा सरकारी शाळांना आधुनिक म्हणजेच मॉडर्न बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये ‘पीएमश्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजना सुरू केली आहे. ही योजना पीएमश्री स्कूल योजना या नावाने ओळखली जाते. या योजनेंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्यात येत असून यामध्ये विकसित झालेल्या शाळा इतर सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या असणार आहेत. या शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत. शाळांभोवती मजबूत भिंत आणि चांगल्या वर्गखोल्या बांधणे, चांगली स्वच्छतागृहे, खेळाची मैदाने बनविणे, प्रयोगशाळा बांधणे, संगणक कक्ष उभारणे, विविध विषयांचे व्यवहारिक ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आदी गोष्टींची पूर्तता या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याच धर्तीवर समग्र अभियानाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रात ‘सीएमश्री’ योजना अमलात आणली जाणार आहे.
सध्या महाराष्ट्रात १ लाख ८ हजार शाळा असून त्यात सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअनुदानित शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २ कोटी ३ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ६५ हजार फक्त सरकारी शाळा आहेत. पीएमश्री योजनेत देशभरातील १६ हजार शाळांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. पीएमश्री स्कूल योजनेसाठी यामधील ८२७ सरकारी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के व राज्य सरकारकडून ४० टक्के निधी दिला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांसाठी केंद्र सरकारकडून पीएमश्री योजनेसाठी २७८ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी केंद्राच्या हिश्श्याचे ७१ कोटी व राज्याचे ४७ कोटी असे मिळून ११८ कोटी मिळाले आहेत.
केवळ सरकारी शाळांनाच – राज्यात पीएमश्रीच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या सीएमश्री योजनेसाठीही केवळ सरकारी शाळांचीच निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला होता. या आढाव्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सीएमश्री स्कूल’ योजना राबविण्यास हिरवा कंदील दाखवला होता. याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागामार्फत तयार केला जात असून त्यामध्ये कोणत्या शाळांचा समावेश करायचा, त्याचे निकष व नियम तयार केले जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.