पीएम सूर्यघर योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा!
PM Suryaghar Yojana 2025
‘घरगुती ग्राहकांचे वीज देयक शून्यवत करणाऱ्या पीएम सूर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रविवारी केले. PM Suryaghar Yojana 2025 या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (मास्मा) यांच्या वतीने बनविण्यात आलेल्या सौररथाचे उद््घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोहोळ यांनी हे आवाहन केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजिनदार समीर गांधी उपस्थित होते.
घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत आहे. घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी येत्या गुरुवार (ता. २३) पर्यंत हा सौर रथ फिरणार आहे. या रथाद्वारे ‘डिजिटल स्क्रिन’च्या माध्यमातून वीजग्राहकांशी थेट संवाद साधला जात आहे. योजनेची माहिती, फायदे, प्रतिकिलो वॅट मिळणारे अनुदान, ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक तसेच माहिती पत्रकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांनी सूत्रसंचालन केले.