जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; राज्यात 7 ठिकाणी नवीन वसतिगृहे उभारणार | Yojana For Jain Students in Maharashtra
Yojana For Jain Students in Maharashtra
List Of Hostel For Jain Students In Maharashtra
Yojana For Jain Students in Maharashtra: जैन समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील सात ठिकाणी नवीन वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह इतर ठिकाणी ही वसतिगृहे उभारली जाणार आहेत. हा निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना आणि व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच ‘विहारधाम निर्माण योजना’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ राबविण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून अधिक निधी मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. राज्यभरातून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची मागणी लक्षात घेऊन सात ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ तयार करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

जैन युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभागाच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि इतर रोजगाराभिमुख योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जैन समाजातील जास्तीत जास्त लोकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि योजनांची माहिती समाजातील प्रमुख व्यक्तींपर्यंत पोहोचावी यासाठी नवी दिल्ली येथे विशेष बैठक आयोजित करण्याबाबतही विचार करण्यात आला.
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल समन्वयक संदीप भंडारी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक केले.
या बैठकीला अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी तसेच महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.


